आ. पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध
कराड (प्रतिनिधी) – कराड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्टीच्यावतीने येथील पंचायत समितीसमोर भाजपचे विधानपरिषद सदस्य आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. निषेधाचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सह्याद्रि कारखान्याचे संचालक जशराज पाटील, माणिकराव पाटील, कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, सुहास पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील माहिती अशी, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत तसेच संरक्षणमंत्री असताना सैन्यदलात संधी उपलब्ध करून देत त्यांचा सन्मान केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुमोल कार्याची आठवण रहावी याकरीता मराठवाडा विद्यापीठास त्यांचे नाव दिले. समाज कोणताही असो त्यांच्यासाठी शरद पवार हे प्रेरणास्त्र्रोत आहेत. कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो ते नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना दिलासा देतात. समाजासाठी अहोरात्र झटणारा योद्धा म्हणून त्यांच्याकडे आज सर्व समाज पाहत आहे. त्यांची कामगिरी बहुमोल आहे.
सध्याच्या करोना महामारीच्या परिस्थितीत समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वादग्रस्त, अशोभनीय, बेताल व निव्वळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेले अविचारी वक्तव्य घृणास्पद आहे. अशा प्रवृत्तीला धडा शिकवला पाहिजे. राष्ट्रीय नेतृत्वावर केलेल्या वादग्रस्त विधानाचा आम्ही निषेध करीत आहोत. संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.