जाधववाडी – येथील नागरी वस्तीत अनेकजण कर्णकर्कश हॉर्न वाजवत वाहने चालवितात. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. अशा वाहनचालकांवर कारवाईची
गरज आहे. Harassment of citizens due to ‘hoarse horn’
अनेक ठिकाणी विशेषतः रुग्णालयांजवळ व नागरी वस्त्यामध्ये “नो हॉर्न’ असा फलक लावलेला असतो. काही ठिकाणी नसला तरी त्या अशा ठिकाणी हॉर्न वाजविण्यास बंदी असते. मात्र, जाधववाडी परिसरात अनेक युवक, तरुण हॉर्न वाजवत वाहनेदामटताना दिसतात.
आरटीओकडून मोठ्या आवाजाच्या हॉर्नवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही अनेक ऑटोमोबाइलच्या दुकानांमध्ये अशा प्रकारचे हॉर्न विकत मिळातात. आपले वाहन अधिक आकर्षक दिसण्यासाठी अनेकजण असे प्रयोग करतात. त्यात कर्णकर्कश हॉर्नचाही समावेश आहे. यात केवळ दुचाकींचा नव्हे तर चार चाकी व अवजड वाहनांचाही समावेश आहे. भर वस्तीतून जाणारे ट्रक चालकही एका विशिष्ट लयात हॉर्न वाजवीत असतात.
त्यामुळे इतरांचे लक्ष विचलीत होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते. मध्यंतरी आरटीओने मोठा आवाज करणाऱ्या दुचाकींचे सायलेन्सर काढून रस्त्यावर एकाच ठिकाणी मांडून त्यावर रोडरोलर फिरविला होता. अशा प्रकारच्या कारवाईची शहरात सध्या गरज आहे. त्यामुळे कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांना चाप बसेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
कठोर नियमावलीची मागणी
ज्येष्ठ नागरिक, रात्रपाळी करून आलेले कर्मचारी, लहान मुले, विद्यार्थी, उपचार घेत असलेल्या रुग्णांना या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचा त्रास होतो. अशा वाहनचालकांवर कारवाई केली तरी पुन्हा काही दिवसांनी ते असे हॉर्न बसवितात. त्यामुळे अशा वाहनचालकांचा परवाना रद्द करावा. त्यामुळे ध्वनी प्रदूषण पसरविणाऱ्या वाहनचालकांवर चाप बसेल. तसेच कठोर नियमावली बनवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.