नवी दिल्ली – नवीन वर्षात भारताला कोविड -19 ची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे संकेत “ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ व्ही. जी. सोमणी यांनी गुरुवारी दिले. बायोटेक्नोलॉजी विभागाने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये सोमणी बोलत होते.
उद्योग आणि संशोधन संस्था काळाच्या कसोटीवर तावून सुलावून गेल्या आहेत, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. बायोटेक्नोलॉजी विभागाने केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना करोना लसीच्या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना निधी मिळाला आहे. आता नवीन वर्षात काही कालावधीत आपल्याला “हॅपी न्यू इअर’चा अनुभव मिळेल, असे संकेत त्यांनी दिले.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट, भारत बायोटेक आणि फायझर या कंपन्यांनी आपल्या कोविड-19 विरोधी लसीला आपत्कालिन वापरासाठीची परवानगी मिळावी म्हणून “डीसीजीआय’कडे अर्ज केले आहेत. साथीचा विचार करून या अर्जांवर वेगाने निर्णय घेण्यात येत आहे. संपूर्ण डाटाची वाट न बघता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या समांतरपणे करण्याची परवानगीही दिली गेली आहे.
मर्यादित स्वरुपातील आपत्कालिन वापरासाठी काही निकष आहेत. जर सुरक्षितता आणि परिणमकारकतेबाबत मर्यादित डाटा उपलब्ध झाला तरी लसीकरण कार्यक्रमासाठी लस बाजारात उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली जाऊ शकेल. मात्र त्यावेळी सुरक्षितता, परिणामकारकता आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही सोमणी म्हणाले.
ऑक्सफर्डची सीरम इन्स्टिट्युटने विकसित केलेली आणि भारत बायोटेकच्या “कोव्हॅक्सिन’ लसीला आपत्कालिन वापरासाठी परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ञांच्या पॅनेलची बुधवारी बैठक झाली. अधिक सविस्तर विचारासाठी या पॅनेलची आणखी एक बैठक 1 जानेवारी रोजी होणार आहे.
सहा लसींच्या चाचण्या सुरू
सध्या सहा लसींवर वेगवेगळ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. त्यापैकी 4 लसी भारतात विकसित केलेल्या आहेत. भारत बायोटेकच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. तर झायडस कॅडिलाच्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.
सीरम इन्स्टिट्युटकडून ऑक्सफर्ड ऍस्टस्ट्राझेनेकाच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत्. तसेच डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडूनही रशियाच्या “स्पुटनिक-व्ही’ लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत्.