मानवी जीवनातलं सुख आणि समाधान हे एक मृगजळ आहे. माणूस त्याला अपेक्षित असणारे सुख, समाधान आणि आनंद हा मिळविण्यासाठी खरोखरच जन्मभर आटापिटा करीत असतो. त्या सुखाच्या मृगजळामागे तो ऊर फुटेपर्यंत धावतो. त्यासाठी नाही नाही त्या खटपटी करतो. अपार कष्ट करतो, मेहनत करतो, घाम गाळतो; पण तरीही त्याला अपेक्षित असणारे सुख, समाधान आणि आनंद हा त्याला त्याच्या जीवनात मिळतोच असं नाही. उलट या धावपळीत तो अधिक दु:खी, कष्टी न् निराश होतो.
आता हे असं का होतं? इतके परिश्रम घेऊनही प्रत्यत्न करूनही जे आणि जेवढं हवं तेवढं का मिळत नाही? या प्रश्नाचं उत्तर जर आपण जाणकार, खऱ्या मार्गदर्शकांना विचारायला गेलो तर ते आपल्याला असं विचारतात की, बाबारे तू आधी मला एक गोष्ट सांग की, समजा एखाद्या माणसाने खूप मेहनत घेऊन एक पाण्याची बादली भरून आणली. पण जर त्या बादलीला भोकं असतील. ती जर फुटलेली असेल, तर काबाडकष्ट करून उरापोटावरून आणलेलं ते सुखासमाधानाचं पाणी त्या बादलीत शिल्लक राहील का? नाही.
ते टिकणारच नाही. त्याप्रमाणेच आपल्याही जीवनरूपी बादलीला आपल्याच मनोवृत्तीची भोके पडलेली आहेत. त्यामुळेच त्या तशा फुटक्या बादलीतले सुखासमाधानाचे पाणी टिकून राहात नाही, तर ते गळून जाते. निघून जाते. त्यामुळेच काल जो माणूस आपल्याला सुखी, समाधानी दिसतो तो आज मात्र सुखी समाधानी असेलच असे नाही.
त्याचं कारण असं की माणसाच्या जीवनरूपी बादलीला असणारी वृत्तीची भोकं. मानवी मनातल्या वृत्ती या क्षणोक्षणी बदलत असतात. मानवी जीवनातील सुखाच्या, समाधानाच्या जागा, वस्तू, वेळ, प्रसंग, लोक हे सारखे बदलत असतात. माणसाच्या मानसिक वृत्तींच्या खेळावरच त्याचे सुख, समाधान हे अवलंबून असते. इथे समर्थ रामदासांचे वचन आठवल्याशिवाय राहात नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे.
हा वैचारिक शोध घेतला, तर त्याचं उत्तर एकच मिळते ते म्हणजे “कोणीच नाही’. आपल्याला आपल्या खऱ्या सुखासमाधानाची जागाही सापडायला हवी. त्यासाठी मात्र एक करायला हवं की आपण सद्गुरूंच्या बोधाने आपल्या जीवनरूपी बादलीची वृत्तीची भोकं बुजवायला हवीत.