देर-अल-बलाह – गाझामध्ये इस्रायवलविरोधात सुरू असलेल्या युद्धाबाबत चर्चा करण्यासाठी हमासचा वरिष्ठ नेता इस्माईल हनिएफ इजिप्तची राजधानी कैरोमध्ये दाखल झाला आहे. गाझामध्ये इस्रायलच्या बॉम्बवर्षावामध्ये तब्बल २० हजार पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
उत्तर गाझामधील एकूण लोकसंख्येच्या ८५ टक्के म्हणजेच तब्बल १९ लाख पॅलेस्टिनींनी दक्षिण गाझामध्ये आश्रय घेतला आहे. गाझामध्ये मानवतावादी मदत वाढवण्याच्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मागणीला इस्रायलने अद्याप विशेष सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.
हमासला दहशतवादी संघटनांच्या काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे आणि ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर ही संघटना नष्ट केलीपाहिजे, अशी मागणी इस्रायलने संपूर्ण जगाकडे केली आहे.
असे असतानाही दोन्ही बाजूंकडून चर्चेला गुप्तपणे पुन्हा सुरुवात केली आहे. या चर्चेला इजिप्त आणि कतारकडून मध्यस्थी केली गेली आहे. यद्धबंदी लागू केली जावी. आणखीन इस्रायली ओलिसांची आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जावी, असा आग्रह या चर्चेदरम्यान धरला जाणार आहे.
अलिकडच्या काळात झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंकडून कोणतीही तडजोड स्वीकारली गेली नव्हती. हनिएफ हे इजिप्तच्या अधिकाऱ्यांशीही युद्धाबाबत चर्चा करणार आहेत, असे हमासने म्हटले आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या युद्धविरामाच्यावेळीही इजिप्त आणि कतारने मध्यस्थी केली होती. आठवड्याभराच्या युद्धविरामादरम्यान १०० ओलिसांची हमासने सुटका केली होती. तर इस्रायलने २४० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडून दिले होते. हमासने २४० इस्रायलींचे अपहरण केले होते. त्यापैकी अजूनही १२९ जण हमासच्या ताब्यात आहेत.
या युद्धात इस्रायलचे १३१ सैनिक मारले गेले. तर हमासचे ७ हजार दहशतवादी मारले गेल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे.
गाझामध्ये युद्धबंदी लागू करण्याचा ठरावसंयुक्त राष्ट्राच्या आमसभेने केला असला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकलेली नाही. त्यासाठी सुरक्षा परिषदेकडूनही सर्व संबंधितांशी चर्चा केली जाऊ लागली आहे. फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीनेही युद्धबंदीच्या मागणीचा आग्रह धरला आहे.
आता अखेरचा एकच वार…
उत्तर गाझामधून हमासचे बहुतांश नेटवर्क इस्रायलने नष्ट केले आहे. तेथील बोगद्यांच्या नेटवर्कमध्ये इस्रायली सैन्य उतरले असून अनेक बोगदे नष्ट केले गेले आहेत. आता तेथील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी एकच अखेरचे ऑपरेशन करणे बाकी आहे, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलन्ट यांनी म्हटले आहे.
मात्र दक्षिण गाझामधील मोहिम आणखीन काही महिने चालू राहू शकते. गझातील दोन क्रमांकाचे शहर खान युनिसमध्ये अनेकदहशतवादी दडून बसले आहेत. त्या सर्वांना संपवल्याशिवाय इस्रायलची मोहिम थांबणार नाही, असेही गॅलन्ट यांनी सांगितले.