Hamas Attack On Israel : हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी आज पहाटे इस्रायलच्या दिशेने डझनभर रॉकेट डागल्याने याठिकाणी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रत्युत्तरादाखल इस्त्रायली लष्करानेही गाझा पट्टीत हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच इस्राईलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली आहे.
इस्रायलवर हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, याला इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी हमासने (Hamas) घेतली आहे. प्रत्युत्तरा दाखल इस्त्रायली लष्करानेही गाझा पट्टीत हवाई हल्ले केले असल्याची माहिती समोर आली आहे.
हमासने (Hamas) केलेल्या रॉकेट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला होता. यासोबतच हमास(Hamas) या दहशतवादी संघटनेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
Rockets firing hasn’t stopped since the morning! #Gaza pic.twitter.com/cw7U9acgPp
— Muhammad Smiry 🇵🇸 (@MuhammadSmiry) October 7, 2023
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. त्या ट्विटमध्ये मंत्रालयाने “तासाभरापूर्वी हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्याचे सांगत दहशतवाद्यांनी देशात रॉकेट डागले आणि इस्रायलच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. इस्रायली संरक्षण दल नागरिकांचे संरक्षण करेल आणि हमासच्या दहशतवाद्यांना धडा शिकवेल.” असा इशारा दिला आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक भागात सायरन वाजले. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेल अवीवमधील संरक्षण दलाच्या मुख्यालयात देशातील सुरक्षेची माहिती घेत आहेत. यासोबतच इस्रायलने सध्या रहिवाशांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, हमासने(Hamas) इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट डागण्यात आल्याचे सांगितले. इस्रायलने ताब्यात घेतलेल्या जमिनीच्याविरूद्ध “ऑपरेशन अल-अक्सा फ्लड” सुरू केल्याची घोषणा केली. इस्रायलच्या लष्करानेही युद्धासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. लष्कराने आपल्या सैनिकांसाठी ‘रेडिनेस फॉर वॉर’ चा आदेश जारी केला आहे. यासोबतच गाझामधील शिक्षण मंत्रालयाने आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.