मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने मध्य प्रदेशातील अनेक उमेदवारांची नावेही घोषित केली आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-1 मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र कैलाश विजयवर्गीय पुन्हा एकदा त्यांच्या बेधडक विधानामुळे चर्चेत आले आहेत.
गुरुवारी कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित केले. त्यावेळी कैलाश विजयवर्गी यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित ‘बूथ अध्यक्षा’ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. “काँग्रेसला एकही मत मिळणार नाही अशा बूथ अध्यक्षाला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ”
“आमच्या विरोधकांनी परिसरातील जनताच आपले कुटुंब असल्याचे सांगत सुमारे दोन लाख साड्यांचे वाटप केले आहे. मला यात जायचे नाही, परंतु प्रभागातील जनता चांगली आहे आणि त्यांनी मतदारसंघात कोणतीही विकासकामे न केल्यामुळे येथे (काँग्रेस) एकही मते पडणार नाही याची खात्री ते घेतील,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी विजयवर्गीय यांनी जनआशीर्वाद यात्रेला जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. राज्यात भाजपचे वातावरण आहे, मोदींची लाट आहे. राज्यात भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. राज्यात सध्या मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. मध्य प्रदेश निवडणुकीत कोणताही पक्ष विजयी झाला तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही त्याचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.