हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथील उड्डाणपूल दुरुस्तीनंतर नुकताच सुरू करण्यात आल्यानंतर या पुलाखालील अस्वच्छतेमुळे हा पूल पुन्हा चर्चेत आला आहे. हडपसर चौक ते गाडीतळ या भागातील पुलाखाली बेघर लोकांनी बस्तान मांडले आहे. यासह रात्रीच्या वेळी अनेक अवैध धंदे सुरू असून पुलाखाली बऱ्याच ठिकाणी कचरा, घाण साचली आहे.
हडपसर गाव ते गाडीतळ या दरम्यान पुलाखाली महापालिकेने सर्वत्र वीज, पथदिवे सुरू करणे महत्वाचे आहे. रात्रीच्या वेळी पुलाखालील परिसरात अंधार पसरत असून त्यामुळे अवैध धंदे बोकाळले आहेत. उड्डाणपुलाखाली सुका कचरा, ओला कचरा साचत असून ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असतात. यातून पुलाखालील भागाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.
या पुलाखाली काही टेम्पो व चारचाकी गाड्या बेकायदेशीरपणे कशाही उभ्या केलेल्या असतात. संपूर्ण मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी रिक्षा भाडे घेण्यासाठी कुठे ही कशाही उभ्या केल्याने मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होते, याठिकाणी गाव ते गाडीतळ वरील सर्व रिक्षांना नियोजनबद्ध थांबे करून परवानगी दिली तर मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकेल. नियोजनबद्ध विकास केला तर हडपसर उड्डाणपूल हे एक शहरातील एक “आयडीएल’ उदाहरण होऊ शकते.