पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उपनगरांसह आता शहराच्या मध्यवर्ती भागातही कमाल तापमान 40 अंशांवर पोहचले आहे. रविवारी (दि. 14) शिवाजीनगर परिसरात 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर, हडपसर येथे सर्वाधिक 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांश भागातील कमाल तापमानात सहा ते सात अंशाने घट झाली होती. मात्र, मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानावर फारसा परिणामा न झाल्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. गेल्या 24 तासांत कमाल तापमानात आणखी वाढू लागली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील कमाल तापमान 38 ते 39 अंशांच्या आसपास होते.
रविवारी हेच तापमान 40 अंशावर पोहचल्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत होता. त्यामुळे दुपारी शहरातील काही रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळाला. दरम्यान, शहरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र तर कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
शहर परिसरातील कमाल तापमान
लवळे – 41.8, हडपसर – 41.7, कोरेगांव पार्क आणि शिरूर – 41.5, वडगावशेरी – 41.3, एनडीए – 40.4, मगरपट्टा 40.1, पाषाण आणि शिवाजीनगर – 40, आंबेगाव – 38.7, बारामती – 38.2, हवेली – 37.2, लोणावळा – 35.4 अंश से.