कोंढवा (महादेव जाधव) –ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अधिकृत प्रभागरचना जाहीर झाल्याने पुणे महानगरपालिका निवडणूक दिवाळीच होणार, असा अंदाज बांधून अनेक इच्छुकांना आता वेध लागले आहेत. 2017च्या निवडणुकीत कोंढव्यासह हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने यश मिळविले होते, तर भारतीय जनता पक्षानेदेखील आपला विजयी वाटा राखला होता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेला संमिश्र यश मिळाले होते. तर, कॉंग्रेसला एकही जागा मिळविता आली नव्हती, त्यामुळे दिवाळीत होणाऱ्या आगामी निवडणुकीत निवडणुकीची विजयी फटाके वाजविण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
प्रभाग रचना जाहीर तरी…
आगामी 2022च्या पालिका निवडणुकीत विजयासाठी प्रभाग रचनाच महत्त्वाची ठरणार आहे. 2017च्या निवडणुकीत भाजपाने स्वतःच्या सोयीनुसार प्रभागरचना करीत मात्तबरांना विजयासाठी झुंजायला लावले होते. यात अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका बसला. तर अनेक नवखे निवडून आले. त्यामुळे आगामी 2022च्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला सत्तेपासुन रोखण्यासाठी भाजपाप्रमाणेच विरोधी मात्तबरांचे प्रभाग तोडण्याचे शस्त्र वापरल्याचे नव्या प्रभागरचनेतून स्पष्ट झाले आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, कॉंग्रेस या राजकीय पक्षांबरोबरच मोठ्या प्रमाणात अपक्ष इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी की स्वबळ यावर अनेकांची गणिते अवलंबून आहेत. मनसे-भाजपा युती याबाबत राजकीय तज्ज्ञांना अद्यापही अंदाज येत नाही, त्यामुळेच अधिकृत प्रभागरचना जाहीर झाली असली तरी युती, आघाडीचे निर्णय होत नसल्याने इच्छुक उमेदवारांनाही निर्णय घेणे अवघड झाले आहे. काही इच्छुक काठावर असून कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊ हाती, अशी त्यांची अवस्था आहे.
पालिकेत समाविष्ठ गावांत….
समाविष्ठ गावांत अनेक इच्छुक तयारीत आहेत. या गावांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य असल्याने जुन्या प्रभागात जेथे महाविकासआघाडीची ताकद कमी आहे तेथे समाविष्ठ गावांचा भाग जोडुन विजयाची गणिते आखण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी 2022 पालिका निवडणूक भाजपा विरुध्द महाविकास आघाडी अशीच होणार आहे. यात कॉंग्रेस, शिवसेना, मनसेची भूमिकादेखील निर्णायक ठरणार आहे. कात्रज, कोंढवा या भागात मनसेचे चांगले प्राबल्य आहे. हडपसरमध्ये देखील मनसेची “वोटबॅंक’ आहे. कोंढवा बुद्रुक भाजपाचा बालेकिल्ला असून या निवडणुकीत देखील बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या प्रभागात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे येथे भाजपाला गड राखण्यासाठी झुंजावे लागणार आहे.
सर्वच पक्षांकडून “दावेदारी’….
कोंढवा खुर्द मध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असून मनसे व सेनेचीही मोठी ताकद आहे, त्यामुळे येथे चुरस असणार आहे. याभागात मुस्लिम मतदार महत्त्वाची भुमिका बजावणार आहेत. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक व एक मनसेचा नगरसेवक येथून निवडुन आला. कोंढवा खुर्दमध्ये शिवसेनेला मतभेद बाजूला ठेऊन एकोप्याने लढावे लागणार आहे. मनसेला येथे विजयाची खात्री आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस विकासाकामांच्या जोरावर प्रभागातील सर्व जागा मिळविण्याचा दावा करीत आहे.