शासनाच्या गुटखाबंदीच्या आदेशाला केराची टोपली
शिक्रापूर -शिक्रापूर परिसरात गुटखा विक्री जोमात सुरू आहे. ही खुलेआम होणारी गुटखा विक्री कोणाच्या आशीर्वादाने चालते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
राज्यामध्ये गुटखाबंदीचे आदेश शासनाने लागू केलेले असताना देखील शिक्रापूर परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. त्यामुळे शासनाच्या गुटखाबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखविली गेल्याचे दिसून येत आहे. गुटख्यामुळे होणारे दुष्परिणाम तसेच गुटखा व तंबाखूमुळे होणारे आजार याबाबत वारंवार चित्रित माहिती शासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात येते. तसेच गुटख्यामुळे अनेक नागरिकांचा वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यानच्या काळामध्ये अनेक ठिकाणी गुटखा विक्रीवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. परंतु गुटखाबंदी असताना शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेर, पाबळ, कोंढापुरी यांसह आजूबाजूच्या सर्वच गावांमध्ये गुटखा विक्री होत आहे. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालय, मंदिर परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असून युवक गुटख्याच्या आहारी गेलेले आहेत.
मग गुटख्यावर का कारवाई नाही?
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी दारू, मटका या अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात आहे. मग गुटखा विक्रेत्यांवर कारवाई का करत नाही? असा देखील सवाल एका हॉटेल व्यावसायिकाने केला आहे.