“गुरुकुल’च्या तांबेंना परिवार संपविण्याची धमकी

-विठ्ठल लांडगे - प्राथमिक शिक्षकांत फिरत असलेल्या पोस्टवरून खळबळ; बॅंकेचे राजकारण भलत्याच मोडवर

नगर -प्राथमिक शिक्षक बॅंकेची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे बॅंकेतील राजकारण अत्यंत गंभीर वळणावर जात असल्याचे चित्र दिसत आहे. बॅंकेची सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे, ते शिक्षक नेते व प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापू तांबे यांना भल्या सकाळीच परिवार संपविण्याची धमकी देण्यात आली.

विशेष म्हणजे ही धमकी ज्येष्ठ नेते व सेवानिवृत्त शिक्षक द. मा. ठुबे यांनीच दिल्याचा दावा तांबे यांनी केला आहे. तशी पोस्टच तांबे यांनी नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ग्रुपवर आज सकाळीच प्रसारित केली. बॅंकेतील राजकारण अशा थराला जाणार असेल, तर नको ते राजकारण, अशा उद्विग्न शब्दांत तांबे यांनी आपली भावना मांडली आहे.

बॅंकेतील राजकारणाच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षकांचे वेगवेगळे गट व संघ आहेत. शिक्षकांच्या जवळपास 68 संघटना असल्याचे सांगितले जाते. जवळपास त्या सर्वच संघटनांच्या ग्रुपवर ही पोस्ट फिरल्याने काही ज्येष्ठ शिक्षकांनी भविष्यातील बॅंकेच्या राजकारणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेला मोठी परंपरा आहे. मात्र, आता बॅंकेतील राजकारणापोटी काहीतरी अघटीत घडेल, अशी भीती त्यांनी व्यक्‍त केली आहे.

आज दुपारनंतर शिक्षकांमधील हा वाद मिटविण्यासाठी काही ज्येष्ठांनी पुढाकार घेतला. तथापि, काही शिक्षकांनीच ठुबे व तांबे यांच्या या कथित भांडणाच्या आगीत आणखी तेल ओतण्याचा प्रयत्न केला. शिक्षक नेते द. मा. ठुबे यांचे एक चिरंजीव बॅंकेत नोकरी करतात. शिक्षक नेत्याच्या मुलास बॅंकेत नोकरी मिळालीच कशी? यावर वेगवेगळी मते आहेत. मात्र, ठुबे यांचे चिरंजीव मंगेश ठुबे यांना यापूर्वीच एका तांत्रिक मुद्यावर बडतर्फ करण्यात आले होते.

दरम्यान, काही कालावधीनंतर बॅंकेत सत्ता आलेल्या एका नातेवाईक ज्येष्ठ संचालकांच्या मदतीने मंगेश ठुबे यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेत त्यांना पुन्हा बॅंकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले. त्यातही शिपाईपदावर बडतर्फ झालेल्या ठुबे यांना थेट लिपिक पदावर हजर करुन घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त झाले.

त्यावरही तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींमुळेच संचालक मंडळाने ठुबे यांच्या वेतनवाढी पुन्हा रोखल्या. या सर्व प्रक्रियेत ज्येष्ठ नेते तांबे यांचाच हात असल्याचा संशय व्यक्त करत ज्येष्ठ नेते द. मा. ठुबे यांनी आज धमकावले, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे बॅंकेतील राजकारण आणखी किती खालच्या थराला जाईल, यावर काही ज्येष्ठांनी चिंता व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.