नवी दिल्ली – कॉंग्रेस पार्टी गुजरात मध्ये सत्तेवर आल्यास सरकारी नोकरांसाठी लागू असलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करेल असे आश्वासन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. आज हिंदी भाषेत त्यांनी ट्विटरवर हा संदेश दिला आहे.
सध्या जूनी पेन्शन स्कीम बंद करून सरकारी नोकरांना पीएफ वरील कॉन्ट्रीब्युशनवर आधारित तोकडी पेन्शन दिली जात आहे. त्यातून निवृत्ती कर्मचाऱ्यांचा गुजारा होणे अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी गुजरातसाठी ही एक नवीन घोषणा केली आहे. त्यांनी या ट्विटरवर म्हटले आहे की, आम्ही तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी नोकऱ्या प्रदान करू तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर प्रमोशन देण्याची व्यवस्था करू असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की कॉंग्रेसच्या राजस्थानातील सरकारने तेथील कर्मचाऱ्यांसाठी हीं जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे. गुजरातमध्येही सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही सत्तेवर आल्यावर तशीच व्यवस्था करू असेही त्यांनी म्हटले आहे. या संदेशात त्यांनी कॉंग्रेस देगी पक्की नोकरी असा हॅशटॅगही चालवला आहे.