सोलापूर : हिंगणघाट जळीतकांड प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक अत्याचाराची घटना घडली. मुलगी अल्पवयीन असून गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी रिक्षाचालकासह 10 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. यातील बहुतांश आरोपी रिक्षाचालक आहेत.
एका अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यात आळीपाळीने 10 नराधमांनी अत्याचार केला. जुलै महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता, वेगवेगळ्या ठिकाणी या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले. मंगळवारी(11 फेब्रुवारी)दुपारी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ पीडित मुलगी रडत बसली होती. एका स्थानिक नागरिकाने ही माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी मुलीला पोलीस स्थानकात आणून तिला विश्वासात घेत चौकशी केली असता तिने या बद्दल माहिती दिली. काही दिवसांपासून काही तरुण पीडित मुलीला जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करत असल्याचे समोर आले. पोलीसांना या घटनेची माहिती कळताच तपासाची चक्रे फिरवली.