राजगुरुनगर – लॉकडाऊनचा फटका आदिवासी ठाकर समाजातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आले आहे. याची दखल वनविभागाने घेत त्यांना पुढील काही दिवस पुरेल एवढा किराणा खेड वनपरिक्षेत्र अधिकारी खेड यांच्या वतीने देण्यात आला आहे.
वेताळे (ता. खेड) येथील ठाकरवाडीतील 48 कुटुंबांला वनविभाग खेड यांच्यावतीने किराणा किट देण्यात आले. आदिवासी ठाकर समाजातील नागरिकांना लॉकडाऊनमुळे रोजगारासाठी बाहेर पडता येत नाही. हातावर पोट असलेल्या घटकाला शिकारीशिवाय दुसरा पर्याय नाही.
त्यामुळे वन्य प्राण्याची त्यांच्याकडून शिकार होऊ नये व त्यांची उपासमार होऊ नये यासाठी खेड वनपरीक्षेत्राच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर आशुतोष शेंडगे यांच्या संकल्पनेतून वेताळे गावाच्या ठाकरवाडी मधील 48 कुटुंबांना जीवनावश्यक किराणा किटचे वाटप करण्यात आले.