किराणा भडकला; ‘किचनचे बजेट’ कोलमडले

नीरा – जिल्ह्यात जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन घटल्यामुळे तरकारीसह किराणा मालाचे भाव गगनाला भिडल्यामुळे लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. महिलांचे महिन्यांचे बजेट देखील गडबडले आहे. सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आला असून हातातोंडाशी आलेले पीक पावसाने गेल्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

पावसामुळे बाजारात शेती मालाची आवक घटली आहे. त्यामुळे लोकांना जास्त दराने भाजीपाला व तरकारी खरेदी करावी लागत आहे. त्याचबरोबर किराणा मालाच्या किंमतीमध्ये सुद्धा मोठी वाढ झाल्याने लोकांच्या मासिक खर्चात वाढ झाली आहे. किराणामध्ये शेंगदाणा, साबुदाणा, डाळी, बाजरी यांच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर खोबरे, खारीक यांचे बाजारभावही वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांत शेंगदाणा 80 किलोहुन 130 रूपये किलो झाला आहे.
त्याचप्रमाणे सुर्यफूल तेलाचा 1285 रुपयाला असणारा डब्बा 1340 रूपये झाला आहे. भगर 80 रूपयांहुन 100 रूपये किलो झाली आहे. शाबुदाना 72 रुपये किलो होता तो आता 88 रुपये किलो झाला आहे. बाजरी 20 किलो होती ती 8 रुपयांना वाढून 28 रूपये किलो झाली आहे. 80 रूपयांना मिळणारी तूरदाळ आता 96 रुपयांना मिळत आहे.

कडधान्याचे भाव 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. मटकी 80 रुपये किलो होती ती 120 किलो झाली आहे. ज्वारीचा भाव 28 रूपयांवरून 40 रूपये किलो झाला आहे. गव्हाच्या भावात फारसी वाढ झाली नसली तरी 24 रूपयावरून हा भाव 28 रूपये झाला आहे. खारीक दोन महिन्यांपूर्वी 120 किलो मिळत होती ती आता 350 रूपये किलो झाली आहे.
सर्वात जास्त लक्षणीय भाववाढ विलायचीमध्ये झाली आहे. 1800 किलो असणारी विलायची आता 6000 रूपये किलो झाली आहे. तर पुढील काळात ती 10 हजार रुपये किलोपर्यंत महाग होईल असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खसखसीचा भावही 550 रूपयांवरून 1400 रूपये किलो झाला आहे. गूळ 10 रूपयाने वाढुन 50 रूपये किलो झाला आहे.

वांगी 60 रुपये किलो होती तह आता 100 रुपये किलो झाली आहे. काकडे 30 रुपये किलो होती ती आता 40, घेवडा 60 रुपयांवरून 80 रुपये, दोडका 60 रुपयांवरून80 रुपये, वाटाणा रुपयांवरून 50 आता 90 रुपये, गाजर 30 रुपयांवरून 60 रुपये, शेवगा 50 रुपयांवरून 100 रुपये, तोंडली 40 रुपयांवरून 80 रुपये, पावटा 40 रुपयांवरून 90 रुपये किलो झाला आहे.

चहामधून वेलायचीचा सुगंध गायब
वेलायचीची किंमत प्रचंड वाढल्यामुळे सध्या चहामध्ये वेलायची वापरण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक व्यावसायिकांनी चहामध्ये सुगंधासाठी वेलायची वापरण्याचे बंद केले आहे. त्यामुळे चहामधून वेलचीचा सुगंध गायब झाल्याचे दिसत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात तरकारीची मागणी असली तरी शेतात पीक नसल्यामुळे भाव वाढले आहेत. यामधून शेतकऱ्यांचा फायदा होताना दिसत नाही. बाजारभाव वाढले तरी शेतमाल नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेला दिसतो.
– तुळशीराम ताम्हणे, शेतकरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)