शासकीय भूखंड हडप प्रकरणाची चौकशी करा

सरपंच रणजित पाटील यांची मागणी

उंब्रज  – वडगांव (उंब्रज), ता. कराड येथील प्रशांत रघुनाथ कदम यांनी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय दोन भूखंडावर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हडप केला असून सदर प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी सरपंच रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

उंब्रज, ता. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडगांव (उंब्रज), ता. कराड येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांनी गावात होत असलेल्या अतिक्रमणा बाबत पत्रकारांना माहिती दिली. यावेळी संभाजीराव कदम, जावेद मुल्ला, कृष्णात कदम, प्रकाश शिलेवंत यांची उपस्थिती होती.

भाजप पदाधिकारी प्रशांत कदम यानी शासनाने तयार केलेल्या गावठाणामध्ये भूखंड क्र. 1/50 व 1/51 हे भूखंड मालकी हक्काचे दाखवून बोगस नोंदी करून हडप केले आहेत. एका भूखंडाला शासकीय मान्यता अथवा भूखंड हस्तांतरण नसताना संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे भूखंड स्वतःच्या नावावर करून त्या जागेवर आर. सी. सी. इमारतीचे बांधकाम केले आहे. तसेच त्यालगत असणारा दुसऱ्या भूखंडावर पत्र्याचे शेड व वॉल कंपाउंड तयार केले आहे.

प्रशांत कदम यांनी त्यांच्या पदाचा, नावाचा गैरवापर करून शासकीय भूखंड हडप केले असल्याची माहिती ग्रामस्थांच्या तक्रार अर्जानुसार ग्रामपंचायत वडगांव (उंब्रज) यांना दिली असून याची वरीष्ठांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कराड उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे पुरावे सादर करून पुढील कार्यवाही करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वरिष्ठ कार्यालयाला अर्ज दिले असल्याचे सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×