वाढीव निधीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील

प्रतापसिंह हायस्कूलच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू
सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ऐतिहासिक प्रतापसिंह हायस्कूलच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू करण्यात आले. वर्ग खोल्यांचे रंगरंगोटी सुरू झाल्याने शाळेत 15 जूनपासून वर्ग सुरू होण्याची शक्‍यता वाढली आहे. ठेकेदाराच्या वाढीव निधीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने पावसाळ्यापूर्वीच कामाला गती मिळाली आहे. अत्यंत संथ गतीने प्रतापसिंह हायस्कूलचे काम सुरू असल्याचे वृत प्रभातने प्रसिद्ध केले होते. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले शिक्षक गणेश दुबळे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून शाळेला निधी उपलब्ध करण्यासाठी मोठी भूमिका बजावली.

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी प्रभातच्या वृत्ताची दखल घेत वाढीव निधीच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल दर्शविला आणि मंगळवार पासून तातडीने शाळेच्या नूतनीकरणाचे रेंगाळलेले काम पुन्हा गतीने सुरू झाले आहे. जुन्या दगडी इमारतीची कौले काढण्यात आल्याने त्या वास्तूची देखभाल दुरुस्तीचा विषय गांभीर्याने हाताळले जात नसल्याची तक्रार करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांवर प्रशासकीय देखरेख नसल्याने काम मुदतीत होईल की नाही या विषयी शंका निर्माण झाल्याने शैक्षणिक वर्तुळात अस्वस्थता होती.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण घेतल्याने साताऱ्याचे प्रतापसिंह हायस्कूल देशभर नावाजले जाते.

शाळेच्या रेकॉर्डला नोंद असलेले दस्तऐवज आजही उपलब्ध आहेत. मात्र या शाळेला जेवढा ऐतिहासिक वारसा आहे तो त्या गांभीर्याने जपला जात नाही ही सातारकरांची खरी खंत वारंवार बोलून दाखवण्यात आली मात्र जिल्हा परिषदेने तक्रारीची फार संधी न देता थेट शाळेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. बारा वर्गाच्या रंगरंगोटीसह मुख्याध्यापक कक्षाचेही नूतनीकरण करण्यात येत असल्याने रामाधान व्यक्त होत आहे. आभवानी पेठेतील या शाळेच्या दगडी इमारतीकरिता सातारा जिल्हा परिषदेने बावीस लाख रुपये निधी मंजूर केला. मात्र ज्या गतीने आणि गांभीर्याने दुरुस्तीचे काम व्हायला पाहिजे ते न झाल्याने निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

दगडी इमारतीची कौले काढण्यात आल्याने आकाशाच्या दिशेने वास्तू मोकळीच आहे. अशावेळी वळीवाचा हंगाम तोंडावर असताना वादळी पाऊस झाल्यास इमारतीच्या लाकडी बांधकामाला धक्का लागणार आहे. इमारतीला बऱ्याच मोठया खिडक्‍या असून गजांअभावी त्या धोकादायक बनल्या आहेत. अचानक वरच्या मजल्यावरून कोणी डोकावल्यास अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. कुजलेले वासे, रंग उडालेल्या भिंती, तळीरामांच्या अड्ड्यामुळे रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्रतापसिंह भाजी मंडईच्या पिछाडीने शाळेत होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांनी शाळेची रया गेली आहे.

ठेकेदाराकडून त्याच्या उपठेकेदाराकडून काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याने 15 जूनच्या शैक्षणिक वर्षात तरी इमारत उपलब्ध होणार का? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौकट- दुबळेंचा पाठपुरावा शिंदेचे लक्ष गणेश दुबळे यांच्या चिवट पाठपुराव्याने प्रताप सिंह हायस्कूलला नवीन झळाळी मिळाली आणि शिंदे यांनी ही प्रस्तावाची छाननी करून तातडीच्या निधीला मान्यता दिल्याने प्रताप सिंह प्रेमींनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)