मॉस्को :- युक्रेनशी गेल्या वर्षभरापासून युद्धात गुंतलेल्या रशियात आता अंतर्गत कलह सुरू झाला आहे. गेल्या काही तासांत तेथे अत्यंत वेगाने घडलेल्या घडामोडींमुळे त्या देशाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांना कदाचित सत्ता गमवावी लागू शकते अशी स्थिती असून, संपूर्ण जगाचे रशियाकडे लक्ष लागून राहिले आहे. रशियातील या नव्या नाट्याची सुरुवात करणाऱ्या वॅगनर आर्मीने तर येत्या काही तासांत रशियाला नवीन राष्ट्रपती मिळतील अशी घोषणाच केली आहे.
खासगी मिलिट्री कंपनी असलेल्या वॅगनर ग्रुपने रशियाच्या लष्कराच्या विरोधातच बंड पुकारले आहे. तर वॅगनर समूहाच्या खासगी आर्मीने जे सशस्त्र बंड केले आहे तो देशद्रोह असून, ज्यांनी कोणी रशियाच्या विरोधात शस्त्रे हातात घेतली आहेत त्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जाईल, असे पुतीन यांनी म्हटले आहे. दरम्यान, देशात मार्शल लॉ लावण्यात आला असून नियम मोडणाऱ्याला ताबडतोब अटकेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वॅगनर आर्मीने एका वाहिनीच्या माध्यमातून संदेश जारी केला आहे. पुतीन यांनी चुकीचा पर्याय निवडला आहे व त्याचे मूल्य त्यांना मोजावे लागेल, असा इशारा देतानाच रशियात आता नवे राष्ट्रपती येतील, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. थोडक्यात रशियात आता गृहकलह सुरू झाला आहे. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. एर्दोगन यांनी रशियाला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते आहे.
संबंधित वॅगनर ग्रुप सीरियात रशियासाठी लढला असून, आताही युक्रेनच्या युद्धात त्यांनी रशियाकडून सहभाग घेतला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांचे आणि रशियाच्या नेतृत्वाचे मतभेद झाले होते. त्यानंतर आता अचानक त्यांनी हा पवित्रा घेतल्यामुळे रशियाची अभूतपूर्व कोंडी झाल्याचे मानले जाते. 2014 मध्ये रशियाने क्रिमीयावर जेव्हा ताबा मिळवला होता तेव्हा वॅगनर ग्रुपचे नाव सर्वप्रथम समोर आले होते. अर्थात या समूहाची कोठे नोंद केलेली नाही. मात्र त्यांचे स्वत:चे नेटवर्क असून, सैनिक उपलब्ध करून देण्याचे काम ते करतात.
* रशियातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या कोब्रा नामक आपत्कालीन समितीची तातडीची बैठक
* रशियाने सुरू केले दहशतवादविरोधी अभियान; इंटरनेट बंद करणार
* पुतीन यांच्या जिवालाही धोका; सैनिकांनी एकत्र येण्याचे माजी राष्ट्रपती मेदवेदेव यांचे आवाहन
* वॅगनरने रशियाला धोका दिला- पुतीन
* आमचे 25 हजार लढवय्ये मरण्यासाठी तयार. त्यानंतर आणखी 25 हजार जण येतील- वॅगनरच्या प्रमुखाचा दावा