नवी दिल्ली – आपची वर्तणूक भाजपची बी टीम असल्यासारखी आहे. अखेरपर्यंत विरोधक ऐक्याचा भाग बनणार की नाही ते स्पष्ट करावे, असे आव्हान कॉंग्रेस नेते जयवर्धन सिंह यांनी शनिवारी आपला दिले.
विरोधी पक्षांची शुक्रवारी पाटण्यात बैठक झाली. त्या बैठकीत कॉंग्रेसने दिल्ली अध्यादेशाला विरोध दर्शवत आम्हाला पाठिंबा जाहीर करावा अशी आपची मागणी होती. मात्र, कॉंग्रेसने तसे न केल्याने आप नाराज झाला. त्यातून त्या पक्षाने विरोधकांच्या पुढील बैठकांत सहभागी होणे आणि कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या आघाडीचा भाग बनणे अवघड असल्याचा इशारा दिला.
ती घडामोड विरोधक ऐक्याच्या दृष्टीने प्रतिकूल मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे आमदारपुत्र जयवर्धन यांनी आपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
विरोधी पक्ष एकत्र येऊन कार्य करण्यास प्रयत्नशील आहेत. दुर्दैवाने, विरोधक ऐक्यासाठी अनुकूल नसणारी भूमिका आपने मांडली. विरोधक ऐक्याबाबत बांधिलकी दाखवल्यास आपचे स्वागतच केले जाईल, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.