मोठा दिलासा: देशात कोरोनाने गाठला ‘पीक’ ! महासाथ ‘या’ महिन्यात आटोक्यात

तज्ज्ञ समितीचा दावा

नवी दिल्ली – देशातील कोरोना महासाथ फेब्रुवारी 2021 पर्यंत पूर्णपणे आटोक्यात येईल असा दिलासादायक दावा केंद्र सरकार नियुक्त तज्ज्ञ गटाने केला आहे. देशातील कोरोना महासाथीने सर्वोच्च सीमा पार केल्याचंही तज्ज्ञ गटातर्फे सांगण्यात आलंय.

असं असलं तरी कोरोनाने पुन्हा डोकं वर काढू नये यासाठी आपल्या सर्वांना सुरक्षिततेच्या उपायांचे काटेकोर पालन करावे लागेल असंही तज्ज्ञ गटाने सांगितलं. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटी पाच लाखांपर्यंत पोहचेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय.

देशभरात आतापर्यंत 75 लाखांच्या आसपास कोरोना रुग्ण सापडले आहेत. रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61781 रुग्ण वाढले तर 1033 रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत हीच संख्या अनुक्रमे 62212 व 837 एव्हढी होती.

देशात रुग्णसंख्या 75 लाखांजवळ
देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 74 लाख 94 हजार 551 एव्हढी झाली आहे. यातील 7 लाख 83 हजार 311 रुग्ण सक्रिय बाधित आहेत. देशातील 65 लाख 97 हजार 209 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 1 लाख 34 हजार 31 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र अद्यापही अव्वल 
गेल्या 24 तासांमध्ये देशभरात वाढलेल्या कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले. 24 तासांत सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पाच राज्यात महाराष्ट्रात (10259), केरळ (9016), कर्नाटक (7184), तमिलनाडु (4295)आणि पश्चिम बंगाल (3865) या राज्यांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 463 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

रिकव्हरी रेट 88 टक्के 
देशातील रकव्हरी रेट वाढून 88 टक्के इतका झाला आहे. तर  मृत्युदर 1.5 टक्के इतका आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 9 लाख 70 हजार 173 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आजतागायत 9 कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.