रुग्णसंख्या वाढली, तरी बरे होणाऱ्यांची संख्या निम्मी
– सागर येवले
पुणे – शहरात करोनातून आतापर्यंत सुमारे 50 टक्के व्यक्ती ठणठणीत झाले आहेत. एकीकडे मे महिना बाधितांच्या संख्येचा चढता आलेख दर्शवतो, तर दुसरीकडे याच महिन्यात सर्वाधिक (1 ते 25 मेपर्यंत) 2 हजार 410 व्यक्ती सुखरूप घरी पोहचले आहेत. ही संख्या नक्कीच दिलासा देणारी आहे. यावरून खबरदारी घेतली तर करोनाची लागण होणार नाही. तर, वेळेत तपासणी आणि उपचार घेतले तर यातून बरेही होऊ शकतो, हे या व्यक्तींनी दाखवून दिले आहे.
पुणे शहरातील बाधितांची एकूण संख्या मंगळवारी सायंकाळपर्यंत 5 हजार 181 वर गेली आहे. सोमवारी (दि. 25) तर या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. विशेषत: मेमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला असून, गेल्या चार दिवसांत तब्बल 1 हजाराने बाधित वाढले आहेत. दुसरीकडे करोनातून बरे झालेल्यांची संख्याही या महिन्यात अधिक आहे. दि.30 एप्रिलपर्यंत 1 हजार 518 बाधितांपैकी केवळ 274 जण म्हणजे साधारण 18 टक्केच व्यक्ती बरे झाले.
मात्र, दि.1 ते 25 मेदरम्यान एकूण बाधितांपैकी 2 हजार 410 म्हणजेच जवळपास 50 टक्के व्यक्ती बरे झाल्याचे दिसून आले. असे असले, तरी काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.
दि. 10 मे रोजी डिस्चार्जचा उच्चांक
शासनाच्या नव्या आदेशानुसार “सलग तीन दिवस करोना बाधिताला कोणतीही लक्षणे नसतील, औषध देण्याची गरज भासली नाही तर दहाव्याच दिवशी त्याला घरी सोडावे,’ असे म्हटले आहे. त्यानुसार दि. 10 मे रोजी सर्वाधिक 194 जणांना घरी सोडण्यात आले. मागील सात दिवसांत ही संख्या वाढली असून, दि. 19 ते 25 मेदरम्यान 1 हजार 434 करोना बाधित सापडले आहेत. त्यातील तब्बल 825 जणांना घरी ठणठणीत बरे करून घरी सोडण्यात आले. हे प्रमाणात जवळपास 60 टक्क्यांपर्यंत आहे.