मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा शरद पवार यांनी यावेळी केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गळ्यात कार्यकारी अध्यक्षपदाची माळ शरद पवारांनी टाकली आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्षांची जबाबदारी टाकल्यानंतर राष्ट्रवादीत घराणेशाही सुरू असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘होय, ही घराणेशाहीच आहे. यापासून मी पळू शकत नाही. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्या घरात माझा जन्म झाला त्यात मला सार्थ अभिमान आहे. जे आरोप करतात त्यांच्या पक्षातील घराणेशाही मी लोकसभेत दाखवून दिली आहे. जेव्हा देशात मला एक नंबरचे रॅंकिग मिळते तेव्हा माझे वडील हे रॅंकिग देत नाहीत. शरद पवारांची मुलगी म्हणून मी संसदरत्न होत नाही. तेव्हा घराणेशाही दिसत नाही, ती फक्त सोयीप्रामाणे दिसते”, असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नव्या नियुक्त्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय चर्चा आहे. या प्रश्नाचे देखील सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, “अजितदादांचा विरोधी पक्षनेते पदाचा रोल मोठा आहे. लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याची भूमिका मुख्यमंत्र्यासारखी असते. मला कार्यकारी अध्यक्षपद मिळेल याची कल्पना देखील नव्हती. कार्यकारी अध्यक्ष झाल्यावर राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडेच असणार आहे.”
सुप्रिया सुळे यांचे ट्वीट
दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पक्षाचे आभार मानले होते. ‘पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार,’ असे ट्वीट त्यांनी केले होते.