राहाता – जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 13 दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी घेण्याकरिता 1 लाख 69 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे अनुदान प्राप्त होणार आहे.
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून लाभार्थींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये रोजगाराच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 5 टक्के सेस निधीतून तालुक्यातून पिठाच्या गिरणीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मंत्री विखे पाटील यांनी तातडीने मंजुरी देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित केले होते.
त्यानुसार 13 लाभार्थींना प्रत्येकी 13 हजार रुपयांप्रमाणे 1 लाख 69 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या विवाहासाठी अनुदान देण्याची योजना आहे. यासाठी तालुक्यातून 2 कुटुंबांतील व्यक्तींचे प्रस्ताव समाजकल्याण विभागास सादर झाले होते. या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.