पारनेर (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणूका असल्या की त्यात लक्ष घालायचे, लोकांमध्ये दहशत निर्माण करायची, दमबाजी करायची हे असले उद्योग तालुक्यात गेले साडेचार वर्षे सुरू होते. येणाऱ्या निवडणुकीत याचे उत्तर तुम्हाला मतपेटीतून द्यायचे असून,या त्रासाला जनता कंटाळली असल्याने डॉ.सुजय विखे यांचा विजय निश्चित असल्याचा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लगावला.
विखे पाटील यांनी सकाळी ११ वाजता पारनेर तालुक्यातील सुपा जिल्हा परिषद गटांत गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सुपा येथील तालुका दूध संघाचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच दत्तात्रय पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
ना. विखे म्हणाले की, महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. त्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला असून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ७० कोटी रुपये जमा झाले आहे. काही दूध उत्पादक शेतकरी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या बाहेर दूध घालतात.
अशा शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले. त्याचे मुख्य कारण म्हणजे कागदपत्रे सादर करण्यात अडचणी येऊ लागल्या. परंतु त्याही आपण दूर केल्या आहेत. भविष्यात एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही ना. विखे यांनी उपस्थितांना दिली. याचा निर्णय मी स्वतः घेणार असून मला कोणाला विचारायची गरज नाही. यामुळे जिल्ह्यातील दूध भेसळ कमी झाल्याचे आवर्जून सांगत भविष्यात भेसळ बंद करून निर्मळ वातावरण निर्माण करायचे असे सांगितले.
तालुक्यात हुल्लडबाजांची काही कमी नाही, त्यामुळे सुपा औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योग बाहेर गेले याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारा खासदार आपणास निवडून द्यायचा आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी विश्वनाथ कोरडे, काशिनाथ दाते, राहुल पाटील शिंदे, विक्रमसिंह कळमकर, सागर मैड, रामचंद्र मांडगे, गणेश शेळके, सरपंच मनिषा रोकडे, योगेश रोकडे, दत्तात्रय पवार, सुनील पवार, सुरेश नेटके, अविनाश पवार, सुखदेव पवार, प्रतापसिंह शिंदे, राहुल पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर तालुका जिल्ह्यात आघाडी घेईल
तालुक्यात अनेकांना कशा ना कशा प्रकारे त्रास दिला आहे. त्याचा वचपा काढण्याची हीच वेळ आहे. तालुक्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेहमीच झुकते माप दिले असल्याने पारनेर तालुका जिल्ह्यात आघाडी घेईल. – राहुल पाटील शिंदे.