विडणी (प्रतिनिधी) – फलटण उपजिल्हा रुग्णालय मध्ये १५ वर्षानंतर पुन्हा नव्याने दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे कामकाज शुक्रवार दि. 12 एप्रिलपासून सुरू झाले असून याचा लाभ फलटण तालुक्यासाह माण, खटाव, खंडाळा या तालुक्यातील दिव्यांगाना मिळणार आहे.
या दिव्यांगांच्या लढ्यासाठी गेली ५ वर्ष्यापासून सतत प्रहार अपंग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केल्याने उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांनी या आंदोलनाची दखल घेतली. आरोग्य विभागाने फलटण उपजिल्हा रुग्णालयात आता दिव्यांग बांधवाना दिव्याग प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात केली आहे. हे प्रमाणपत्र वितरीत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुकवारी होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. विक्रांत पोटे यांनी दिली.
सुरुवातीला अंध दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र देण्याची सुरुवात होत आहे, तसेच उर्वरित विभागाचे अस्थिव्यंग, कर्णबधीर, मतीमंद तसेच नाक, घसा या विभागाची प्रमाणपत्रे लवकरच वितरीत होणार असल्याची माहिती अधीक्षकांनी दिली आहे.
त्यामुळे फलटण तालुक्यातील परिसरातील दिव्यांग बांधवांकडून समाधान व्यक्त होत आहे. म्हसवड, माण, खटाव, लोणंद, खंडाळा, या भागातील दिव्यांग बांधवांना लाभ घेता येणार आहे. या भागातील दिव्यांग बाधवाना आता सातारा जिल्हा रुग्णालयाला मध्ये जाण्याची गरज नाही. त्यांचा वेळ व ७० कि.मी. प्रवास वाचणार आहे. हे सर्व प्रहार अपंग क्रांती संघटना, प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झाले आहे.