नगर (प्रतिनिधी) – अमरावती येथून सहा दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या चिमुकल्याची नगर पोलिसांनी सुखरूप सुटका केली. केवळ पैशाच्या हव्यासापोटी सावत्र आजीने नातवाच्या अपहरणाचा कट आखल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
अमरावती शहरातील नयन मुकेश लुनिया (वय 4) याला आजी घराबाहेर फिरायला घेऊन गेल्या असता दुचाकीवर आलेल्या अनोळखी महिला व पुरषांनी त्याला उचलून पळ काढला. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत महेंद्र श्रीरामजी वाटणकर यांच्या फिर्यादीवरून राजापेठ(अमरावती) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आरोपींनी अपहरण करून मुलाला नगरमध्ये आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार 19 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी नगर शहरातून हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे, अल्मस ताहीर शेख, मुसाहीब नासीर शेख यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या माहितीवरून आसिफ हिनायत शेख, फैरोज रशीद शेख (सर्व रा. कोठला) यांना ताब्यात घेऊन नयन लुणिया याची सुटका केली. नगर पोलिसांनी आरोपींना अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपी हिना शेख आणि नयन लुनिया याची सावत्र आजी दोघी सख्या बहिणी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे हिना शेख हिचे नेहमी अमरावतीला जाणे-येणे होते. लुनिया यांच्या घरी मोठी प्रॉप्रटी असल्याने नयनचे अपहरण केल्यानंतर ते लोक सहज पैसे देतील, असा कट नयनची सावत्र आजी, हिना शेख व अन्य आरोपींनी आखला. दोन महिन्यांपासून ते नयनचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत होते. पण, त्यांना संधी मिळत नव्हती.
16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी नयनची सावत्र आजीने त्याला खेळण्यासाठी बाहेर आणले. त्याच्या घराजवळच उद्यान असल्याने अन्य आरोपी तिथे जवळच थांबले होते. त्या सावत्र आजीने नयनला आरोपींच्या ताब्यात दिले. आरोपी त्याला घेऊन पसार झाले. आरोपींना लुनिया कुटुंबांकडून पैशाची अपेक्षा होती. मात्र, ते पोलिसांत गेल्याने सगळा भांडाफोड झाला. पोलिसांनी त्या उद्यानातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. ते फुटेज नगर पोलिसांना दिल्यानंतर माहिती घेतली असता आरोपी नगरमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. 18 फेब्रवारी रोजी रात्रीच पोलिसांनी आरोपींना नगर शहरातील विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले. पोलिस तपासात पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रेय हिंगडे, संदीप घोडके, पोलिस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, दीपक शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सोप होत पण अवघड झालं…
हिना शेख व तिच्या बहिनीने नयनच्या अपहरणाचा कट आखला. हे काम अत्यंत सहज होणार असून, त्यात चांगले पैसे मिळतील, असे अन्य आरोपींना भासविले. पण, झाले भलतेच. सहज पैसे मिळण्याऐजवी सर्वच अपहरणाच्या गुन्ह्यात अडकले.
सावत्र आजीच अपहरणाच्या गुन्ह्याची मुख्य सूत्रधार निघाली असून, आज पुन्हा एका महिलेला नगरमधून ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली सर्व वाहने अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.
अनिल कटके, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा