मुंबई – अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम (मोटेरा स्टेडियम)चे नाव बदलण्यात आलं आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान म्हणून मोटेरा स्टेडियम ओळखले जाते. मात्र या नामांतरावरून मोदींवर टीका होत आहे. काँग्रेसनेते हार्दिक पटेल यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर कडाडून टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशाला काय नेता मिळाला. त्यांना भीती आहे की लोक कदाचित त्यांना विसरतील. मोदींचं निधन झाल्यावर कोणी त्यांची आठवण ठेवेल, यावर त्यांचा विश्वास नाही. म्हणूनच मरण्यापूर्वी, स्टेडियमला त्याचे नाव देण्यात आल्याचे आंबेडकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे.
क्या नेता मिला है देश को। इनको चिंता है कहीं लोग इन्हें भूल न जाए। इन्हें लोगों पर भरोसा नही है कि गुजर जाने के बाद कोई…
Posted by Balasaheb Ambedkar on Wednesday, 24 February 2021
याआधी स्टेडियमच्या नामांतरावरून काँग्रेसनेते हार्दिक पटेल यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका केली आहे. अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम करण्यात आलं आहे. हा सरदार पटेल यांचा अपमान नाही का ? सरदार पटेल यांच्या नावाने मतं मागणारं भाजप सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातमधील जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही, असं ट्विट हार्दिक पटेल यांनी केलं.