नाशिक :- राज्यात उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्य औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नाशिक येथील हॉटेल ताज गेट वे मध्ये आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उद्योग क्षेत्रात पुरूषांसोबतच महिला उद्योजकांचा सहभाग वाढत आहे. महिला उद्योजकही औद्योगिक क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सवलती जाहीर केल्यामुळे उद्योगक्षेत्राची भरभराट होतांना दिसत आहे. नाशिकला उद्योगवाढीस भरपूर वाव असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी भविष्यात निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. उद्योग क्षेत्राच्यावाढीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचेआहे.
राज्य शासन उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी पूर्णपणे सकारात्मक आहे. राज्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या काही सूचना असल्यास त्या आपण शासनाकडे पाठवाव्यात. या सूचनांची शासनस्तरावर दखल घेण्यात येईल. उद्योजकांना पूर्णपणे संरक्षित केले पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी योवळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबाबत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.