शिक्षक भरती उमेदवारांसाठी “गुड न्यूज’

पवित्र पोर्टलद्वारे 17 जूनपर्यंत शाळांमध्ये नियुक्‍त्या देणार

पुणे – पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यातून आधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये पेत्या 17 जूनपर्यंत शिक्षकांना नियुक्‍त्या देण्यात येणार आहेत.

पवित्र पोर्टलमध्ये विविध अडचणी येत असल्याबाबत उमेदवारांकडून मोठ्या संख्येने तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. या सर्व तक्रारीवर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आझम कॅम्पसमध्ये उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांच्यासह “एनआयसी’चे अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विविध भागातील सुमारे 500 उमेदवारांनी यावेळी उपस्थिती लावली.

पहिल्या टप्प्यात 12 हजार शिक्षकांच्या रिक्‍त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. शाळांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, ही माहिती भरताना उमेदवारांना अनेक अडचणी येऊ लागल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. शिक्षण आयुक्तांची स्वत: उमेदवारांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या. सर्व उमेदवारांच्या प्रश्‍नांना उत्तरेही दिली. तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील. शाळांचा पसंतीक्रम भरण्यासाठी दोन-तीन दिवसांची मुदतवाढही देण्यात येणार आहे. माहितीत दुरुस्ती करण्यासाठी आता उमेदवारांना शेवटची एकच संधी देण्यात येणार आहे, असे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांच्या नेमणुका या शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच करण्यात येणार आहेत. त्यानंतर खासगी शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्‍त्या या मुलाखत प्रक्रियेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहेत. आझम कॅम्पसमध्ये उमेदवारांसाठी संगणक लॅबही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी उमेदवारांची गर्दी जमल्यामुळे गोंधळही उडाला. विभागीय पातळीवर मदत कक्षही उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

इंग्रजी माध्यमातून डी.एड., बी.एड, उतीर्ण झालेल्या उमेदवारांना मुंबई महापालिकांच्या रिक्त जागांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अन्य उमेदवारांनी मुंबई महापालिकेचे प्राधान्यक्रम भरू नयेत. काही उमेदवारांना लॉग-इन करण्यात अडचण येत आहेत. “इनव्हॅलिड यूआरएल’ असा मेसेज येत असल्यास या अडचणी दूर करण्यासाठी काम सुरू असून ते दोन-तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. अर्जाची ड्राफ्ट कॉपी असलेल्या उमेदवारांना अर्ज स्वप्रमाणित करुन घेण्यासाठी 30 मेपर्यंत सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहे. अर्ज स्वप्रमाणित करताना टीईटी व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या प्रमाणपत्रातील माहितीत नाव, जन्म तारिख यात तफावत असल्यास संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी वेळेत संपर्क साधावा लागणार आहे.

शाळांचा पसंतीक्रम लॉक करण्याची सुविधा लवकरच
नॉन क्रिमीलेयर, शैक्षणिक पात्रतेतील माध्यम, समांतर आरक्षण यात बदल करण्यासाठी 30 मे रोजी सुविधा पुरविण्यात येणार आहे. माध्यम बदलाची सुविधा दिल्यानंतर इयत्ता दहावीच्या सेमी इंग्रजी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यम निवडावे. शाळांचा पसंतीक्रम लॉक करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होईल. उमेदवारांना त्यांनी नोंदविलेल्या मोबाइलवर ओटीपी प्राप्त झाल्यानंतरच पसंतीक्रम लॉक करता येणार आहे. या सर्व सूचना उमेदवारांच्या माहितीसाठी पोर्टलवर प्रसिद्घ करण्यात आलेल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here