नवी दिल्ली : आज ऑक्टोबर महिन्याचा पहिलाच दिवस…महिन्याच्या सुरुवातीलाच दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवे इंधन दर जारी झाले असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. आजपासून 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मुंबईमध्ये 32.50 रुपये, दिल्लीमध्ये 25.50 रुपये, कोलकातामध्ये 36.5 रुपये तर चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये किमतीला मिळेल. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर त्याच दरात मिळणार आहेत.
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्यांदा कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जागतिक बाजारपेठेत शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस महाग होण्याची शक्यता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर 8.57 प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी 6.1 प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट (MBTU) होता.