नवी दिल्ली – देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. मात्र असे असतानाच दिलासादायक माहिती समोर आली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किंमतीत घट केली आहे. विशेष म्हणजे 91.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
त्यानुसार आता 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मुंबईत 91.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यानुसार व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1980 रुपयांना खरेदी करता येईल. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 91.5 रुपये स्वस्त होऊन तो 2028 रुपयांना उपलब्ध होईल. तर कोलकतामध्ये एलपीजी सिलिंडर 89.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यानुसार व्यावसायिक गॅस सिलेंडर 2132 रुपयांना मिळणार आहे.
दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल न झाल्याने किंमती स्थिर आहेत. दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आहे. मागील महिन्यात 50 रुपयांनी तर 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 350 रुपयांनी महागला होता. मात्र एप्रिल महिन्यात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.