घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर नुकतेच वाढवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महागाई सातत्याने वाढत असल्याने आधीच करोना संकटात भरडून निघालेल्या सामान्य जनतेचे बजेट कोलमडून पडले आहे. अशातच आता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काँग्रेस पक्षच काम करतो, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
याबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून यामध्ये त्यांनी घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. ते लिहतात, ‘काँग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे.’
‘आज एका सिलिंडरची किंमत काँग्रेसच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त काँग्रेसच काम करते. हा आपल्या आर्थिक धोरणाचा गाभा आहे.’ असेही ते म्हणाले.
LPG Cylinder
Rate Subsidy
INC (2014) ₹410 ₹827
BJP (2022) ₹999 ₹02 cylinders then for the price of 1 now!
Only Congress governs for the welfare of poor & middle class Indian families. It’s the core of our economic policy.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 8, 2022
सिलिंडरमागे ५० रुपयांची वाढ
स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती शनिवारी सिलिंडरमागे ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या. इंधनांचे आंतरराष्ट्रीय दर वाढल्यामुळे सहा आठवड्यांत झालेली ही दुसरी वाढ ठरली. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्व वस्तू आणि सेवांसाठी अधिक किंमत मोजावी लागत असतानाच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या नव्या दरवाढीचे ओझे नागरिकांवर पडले आहे.
सरकारी इंधन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनाअनुदानित गॅसच्या १४.२ किलोग्रॅम सिलिंडरसाठी आता सध्याच्या ९४९.५० रुपयांऐवजी ९९९.५० रुपये मोजावे लागतील.