पणजी – जानेवारी 2024 पासून गोव्यात सर्व नवीन पर्यटक वाहने, तसेच भाड्याने दिल्या जाणाऱ्या कॅब आणि मोटारसायकल ही वाहने इलेक्ट्रिक वाहने असावीत, असा आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. गोवा सरकारने या राज्यात वीजेवरील वाहनांना चालना देण्यासाठी मोठ्या उपाययोजना केल्या आहेत. पणजी येथे जी 20 अंतर्गत चालू असलेल्या चौथ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
कोणत्याही राज्यात खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या टक्केवारीनुसार गोवा भारतात चौथ्या क्रमांकावर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, पुढील वर्षी जानेवारीपासून सर्व नवीन पर्यटक वाहने, टॅक्सी आणि भाड्याने दिलेली मोटारसायकल अनिवार्यपणे इलेक्ट्रिक वाहने असणे आवश्यक करण्यात आले आहे. जानेवारी 2024 नंतर खरेदी केली जाणारी सर्व सरकारी वाहनेही इलेक्ट्रीकच असतील असे ते म्हणाले. मल्टिपल टुरिस्ट टॅक्सी, रेंट-ए-बाईक आणि रेंट-ए-कॅब ऑपरेटर या परमिटधारकांना जून 2024 पर्यंत त्यांच्याकडील 30 टक्के वाहने वीजेवर चालणारी वाहने म्हणून परावर्तीत करावी लागणार आहेत.
वाहनांमुळे 40 टक्के कार्बन उत्सर्जन
वाहनांच्या घनतेच्या बाबतीत गोवा जगात 15 व्या क्रमांकावर आहे. गोवा जागतिक पर्यटन हॉटस्पॉट असल्याने, या राज्याची लोकसंख्या 15 लाख असली तरी दरवर्षी 85 लाखांहून अधिक पर्यटक गोव्याला भेट देतात. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार गोव्यात निर्माण होणाऱ्या एकूण कार्बन उत्सर्जनापैकी 40 टक्के कार्बन उत्सर्जन हे वाहनांमुळे होते.