पणजी – देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. ५ राज्यांपैकी ४ राज्यांमध्ये भाजपला जोरदार आघाडी मिळाल्याचे दिसत असून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचं दिसतंय. गोव्यामध्ये देखील भाजपने आघाडी घेतली असून येथील विधानसभेच्या एकूण ४० जागांपैकी १८ जागांवर भाजप उमेदवार पुढे असल्याचे दिसत आहे.
गोवा विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या कामगिरीवर आता राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते विश्वजित राणे यांनी गोव्यामध्ये भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पक्षाने सुरुवातीलाच घेतलेल्या आघाडीवर भाष्य करताना राणे यांनी, गोव्यातील जनतेने भ्रष्टाचाऱ्यांना व बाहेरून आलेल्यांना नाकारलं असल्याचं म्हटलंय.
गोव्याचा मुख्यमंत्री कोण? राणे म्हणतात…
दरम्यान, गोव्यामध्ये भाजपला बहुमत मिळाल्यास गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांना पुन्हा एकदा संधी मिळणार का? असा प्रश्न विचारला असता, राणे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे सांगितले.
एक्झीट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार गोव्यामध्ये भाजप व काँग्रेस दरम्यान बहुमतासाठी चुरस असेल असे भाकीत करण्यात आले होते. मात्र निवडणूक निकालांतून भाजप एकूण ४० जागांपैकी जवळपास निम्म्या जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
#GoaElections | We will sweep this Goa election. People have rejected scamsters, outsiders. They have voted for a party that works for the people of Goa: BJP leader Vishwajit Rane
“Party leadership will decide,” he says, on being asked if Pramod Sawant will continue as the CM. pic.twitter.com/C7bJ4NErfD
— ANI (@ANI) March 10, 2022