साताऱ्यातील आर्किटेक्‍टचा जागतिक पातळीवर गौरव

अभिजीत पारसनीस यांना आयसीएससी व्हिवा पुरस्कार 

सातारा – साताऱ्याचे आर्किटेक्‍ट अभिजीत पारसनीस यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना जागतिक पातळीवरील “आयसीएससी व्हिवा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ शॉपिंग सेंटर्स तर्फे जगातील सर्वात सृजनशील, नाविन्यपूर्ण आणि सभोवतालच्या पर्यावरणाशी संतुलन साधणाऱ्या डिझाईनसाठी जगातील शॉपिंग सेंटर्स विचारात घेऊन “आयसीएससी व्हिवा’ ऍवॉर्ड दिले जाते. यंदाचे हे ऍवार्ड ऑस्ट्रेलियातील चॅडस्टन शॉपिंग सेंटरच्या डिझाईनला आणि कामाला देण्यात आले.

जगातील सर्वोत्कृष्ठ डिझाईन म्हणून चॅडस्टन शॉपिंग सेंटर (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) ठरले तर द्वितीय क्रमांक डॉक्‍स, ब्रुसेल्स (ब्रुशसेल्स, बेल्जियम) मधील कामाला मिळाला. मेलबर्न येथील चूडस्टन या शॉपिंग सेंटरचे काम द बकन कंपनीने नुकतेच केले. चॅडस्टन हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शॉपिंग सेंटर आहे. सेंटरचे व्यावसायिक क्षेत्र सुमारे दोन लाख 15 हजार चौरस मीटर असून येथे दहा हजार वाहने पार्क करण्याची सोय आहे. दरवर्षी सुमारे दोन कोटी 30 लाख लोक येथे खरेदीसाठी येतात.

येथील वार्षिक व्यापारी उलाढाल 2.20 अब्ज डॉलर्स इतकी आहे. सेंटरचे 25 हजार चौरस मीटरचे नवीन बांधकाम नुकतेच करण्यात आले. अमेरिकेतील लास व्हेगास शहरात “आयसीएससी व्हिवा’ हा पुरस्कार सेंटरला प्रदान करण्यात आला. द बकन ग्रुपतर्फे या संपूर्ण कामाची जबाबदारी घेणारे आणि डिझाईनर म्हणून आर्किटेक्‍ट अभिजित पारसनीस यांना हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. हे काम द बकन ग्रुपतर्फे मूळचे सातारा येथील आर्किटेक्‍ट अभिजीत पारसनीस यांच्या नेतृत्वाखालील टीमने पूर्ण केले. या कामात अनेक फेॅशन डिझाईनर कपडयांची दुकाने, टेस्ला कार कंपीनीची मोठी शोरूम, ऑस्ट्रेलियातील पहिले लेगोलॅंड डिस्कव्हरी सेंटर, 16 स्क्रिनचे सिनेमा थिएटर, जागतिक कीर्तीच्या अनेक शेफ्‌सनी चालू केलेली रेस्टॉरंटस्‌ आदींचा समावेश आहे.

साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या श्री. अभिजीत पारसनीस यांनी पुणे विद्यापीठातून बी. आर्च. ही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ते क्‍विन्सलॅंड युनिव्हर्सिटी, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले. परदेशात उच्च शिक्षण घेतल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलियातच कामाला सुरूवात केली. अभिजीत पारसनीस हे सातारा येथील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक अवनिश पारसनीस यांचे पुत्र होत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)