निशांत पाटलांचे नक्की चाललंय तरी काय?

सातारा  – सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद व खासदार उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक निशांत पाटील यांनी आघाडीशी फारकत घेत स्वेच्छेने विजनवास पत्करल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उदयनराजेंचे कट्टर समर्थक असणाऱ्या निशांत पाटलांच्या मनात चाललयं काय, याचा रहस्यभेद होईनासा झाला आहे. अगदी अनौपचारिक संवादातही प्रतोद पदाच्या राजीनाम्याची भाषा येऊ लागल्याने आघाडीत अस्वस्थता आहे.

उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीची हॅटट्रिक आणि राजघराण्याच्या विरोधात जाऊन एका सामान्य कुटुंबातील गृहिणीला नगराध्यक्षपदी निवडून आणण्याची राजेंनी दाखवलेली राजकीय कमाल यामुळे गेल्या अडीच वर्षात सातारा विकास आघाडीने शहराच्या राजकारणात अनेक राजकीय चढउतार बघितले. अंतर्गत गटबाजी, इलेक्‍टेड आणि सिलेक्‍टेड मधील छुपा संघर्ष, नगराध्यक्षांच्या विरोधातील नगरसेवकांचे छुपे युद्ध यामुळे सातारा विकास आघाडी कायमच टीकेच्या आणि विरोधाच्या रडारवर राहिली. मात्र, आघाडीचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी गेल्या अडीच वर्षात लोकसभा निवडणुकांचा अपवाद वगळता आघाडीच्या अंर्तगत राजकारणातून अंग काढून घेतले.

साताऱ्याच्या राजकारणात आणि सदर बझारमधील समाजजीवनाशी नाळ असणाऱ्या निशांत पाटलांनी पुण्याचा रस्ता कधी पकडला, हे कोणाच्याच लक्षात आले नाही. घराण्याचा समृद्ध राजकीय वारसा, वडील धैर्यशील पाटील ज्येष्ठ विधिज्ञ, स्वतःची नगराध्यक्षपदाची सव्वा वर्षाची कारकिर्द, वॉर्डात सर्वसामान्यांशी सुसंवाद असणाऱ्या निशांत पाटलांनी गेल्या दीड वर्षात सर्वसाधारण सभा वगळता पालिकेकडे फिरकणेच सोडून दिले आहे. सातारा विकास आघाडीत नव्या सभापती निवडीची सध्या राजकीय गरमागरमी सुरु आहे. मात्र, संभाव्य नावांची यादी ही नेत्यांनंतर पक्ष प्रतोदाकडून येणे अपेक्षित असताना सध्या संपर्क माध्यम हॉटेल रजताद्री आहे. येथून जी सूत्रे हालतात ती नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना बंधनकारक असल्याचा सातारा विकास आघाडीचा संकेत आहे.

अर्थातच या निर्णयावर अंतिम मोहोर खासदारांची असते. मात्र, या निर्णय प्रक्रियेत निशांत पाटील कोठेच नसतात. त्यामुळेच त्यांचा राजकीय विजनवास येथील सतर्क सातारकरांना निश्‍चित खटकू लागला आहे. सव्वा वर्षाची नगराध्यक्षपदाची कारकिर्द 2008 मध्ये निशांत पाटलांनी दणक्‍यात गाजवली. यंत्रणा ताब्यात ठेऊन कामाची तड लावण्याचा त्यांचा खाक्‍या होता. मनमानी करून कुठलेही आरक्षण उठवण्याच्या राजकीय हालचालींना त्यांनी स्वतंत्रपणे चाप लावला होता. कामाची ती तडफ अकरा वर्षानंतरही कायम असली तरी पाटलांच्या चेहऱ्यावरचा राजकीय तजेला हिरमुसला आहे.

आघाडीतल्या अंर्तगत गटबाजीला कंटाळून त्यांनी पालिकेत यायचे सोडून दिल्याचे बोलले जाते. येत्या 20 जुलै रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेला निशांत पाटील येतील. मात्र ती सभा उपस्थितीची केवळ औपचारिकता असेल. पाटलांच्या राजकीय विजनवासांची चर्चा थेट उदयनराजे यांच्याकडे पण झाली. मात्र, राजेंच्या राजकीय व्यस्ततेमुळे या विषयावर गांभीर्याने चर्चा होऊ शकली नाही. उदयनराजेंच्या मर्जीतला हा कार्यकर्ता सध्या विद्यमान समर्थकांच्या गर्दीपासून आणि सातारा विकास आघाडीपासून दूर आहे. त्यामुळे निशांत पाटलांच नक्की चाललय काय, असे विचारण्याची वेळ नक्कीचं आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)