हाफिज सईद तुरूंगात नाही तर अधिक्षकांच्या बंगल्यात मजेत राहतोय
लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व बंदी घातलेल्या जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला बुधवारी पाकिस्तानात अटक झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, सईद हा तुरुंगात नसून एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या बंगल्यात राहत असल्याची माहिती समोर येत आहे.
हाफिज सईदला अटक करण्यात आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. तसेच दहा वर्षांच्या शोधानंतर हाफिज सापडल्याचे म्हटले होते. यावेळी पाकिस्तानच्या एक अँकरने त्यांना हाफिजला शोधले नाही, तर तो पाकिस्तानात खुलेआम फिरत असल्याचे सांगितले होते. हाफिजला अटक करून पाकिस्तानने अमेरिकेची वाहवा मिळवलेली असली तरीही कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. हाफिजला पाकिस्तानने गुजरावाला जेलमध्ये डांबल्याचे म्हटले होते. मात्र, गुरुवारी काही सुत्रांनी हाफिज या जेलमध्ये नाही तर तुरुंग अधिक्षकांच्या बंगल्याच व्हीआयपी सेवा उपभोगत असल्याचा दावा केला आहे.