मंचर -आंबेगाव तालुक्यातील घोडगाव, पिंगळवाडी ही दोन्ही गावे कोरोनामुक्त झाली असली तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पिंगळवाडी (लांडेवाडी) येथे दि. 26 मे रोजी 42 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. घोडेगावमधील पती, पत्नी व मुलगा एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संबंधित व्यक्तींना मंचर येथील भीमाशंकर हॉस्पिटल येथे तपासणीसाठी नेले.
त्यावेळी पतीचा व मुलाचा अहवाल निगेटीव्ह आला (दि.29) रोजी पत्नीचा (वय 34) अहवाल पॉझिटीव्ह आला. प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून दि. 26 व 29 मे रोजी संबंधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले होते. तर पोलीस यंत्रणेने जा-ये करणारे रस्ते बंद केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व्हे केला.
सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उपाययोजना म्हणून पिंगळवाडी (लांडेवाडी), घोडेगाव गावठाण, चिवलदरा व आंबेशेत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. पाच किलोमिटर परिसर बफर झोन केला होता. त्यानंतर रुग्ण आढळला नाही. शुक्रवारी (दि. 5) घोडेगाव व पिंगळवाडी (लांडेवाडी) येथील बाधितांनी करोनावर मात करीत घरी परतले आहे.