लोणंद (प्रतिनिधी) – लोणंद, ता. खंडाळा येथील इंदिरानगर परिसरात पाण्याची समस्या असल्याने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी स्वतः तेथे पाहणी केली. यावेळी त्यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून लोकांची समस्या जाणून घेतली.
लोणंद येथील इंदिरानगर परिसरातील पाण्याची टाकी अस्वच्छ असल्याची तक्रार गणेश माने व अन्य नागरिकांनी मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांच्याकडे केली होती; परंतु टाकीतील पाणी स्वच्छ असल्याचे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतरही लोकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून पाहणी केली. त्यावेळी पाण्याची टाकी पूर्ण स्वच्छ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी परिसरातील गटारांचीही पाहणी केली.
या परिसरातील गटारांची दुरवस्था झाली आहे. वस्तीतील अजून काही ठिकणी अपूर्ण असलेले बंदिस्त गटाराचे काम पूर्ण करावे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे. पंतप्रधान योजनेतून मदत मिळणार म्हणून कर्जे काढून शौचालये बांधणाऱ्यांना सरकारी अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. सार्वजनिक शौचालये व गटारांची वेळच्या वेळी सफाई करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात, अशा मागण्या लोकांनी केल्या. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन ढोकले यांनी दिले..