गौतम नवलखा, तेलतुंबडेंना हायकोर्टाचा दिलासा

शुक्रवारपर्यंत अटक न करण्याचे पुणे पोलीसांना आदेश
मुंबई : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी एकत्रीत सुनावणी घेण्याचे निश्‍चित करत तोपर्यंत या दोघांनाही अटक करू नये, असे आदेश पुणे पोलिसांना दिले.

भिमा कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी हायकोर्टात अर्ज केला. हायकोर्टाने हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला, परंतू 12 नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. ही मुदत संपल्याने त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

त्यामुळे नवलखा यांनी ऍड. युग चौधरी यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला. तर या प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांचा प्रलंबित असलेल्या अर्जावर एकत्रित सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

Leave A Reply

Your email address will not be published.