कोरेगाव भीमा शौर्यदिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी
कोरेगाव भीमा/शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दि. 1 जानेवारी रोजी शौर्यदिनी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रम पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांकडून प्रत्येक बाबींवर लक्ष दिले जात आहे. येथील सोशल मीडियाच्या माध्यमातून या भागातील व्हॉट्सऍप ग्रुपवर समाज विघातक, आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर, व्हिडिओ पोस्ट टाकून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परिसरातील 530 व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनला नोटिसा देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ग्रुपवरही पोलिसांचे लक्ष असून संबंधित ऍडमिनवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 120 व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनला तर तर लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील 410 व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनला पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रुप ऍडमिनने आपल्या ग्रुपवर लक्ष ठेवण्यासह योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर व लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली.
व्हॉट्सऍप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रुप ऍडमिनलाच जबाबदार धरून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. या गुन्ह्यासाठी तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सर्व व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिन यांनी सावध राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
ऍडमिन सावधान…
शक्यतो ग्रुप ऍडमिन यांनी आपल्या व्हॉट्सऍप ग्रुपचे सेटिंग बदलून पोस्टचे नियंत्रण करावे, जर ग्रुपवर समाजात तेढ अथवा अफवात्मक संदेश पसरविण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासह ऍडमिनवर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे ऍडमिननी सावधानता बाळगावी, असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.