दुबई – इराणमधील नैसर्गिक गॅसच्या पाईपलाइनचा काल मोठा स्फोट झाला. या स्फोटामागे घातपात किंवा दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे तणाव वाढत असताना हा स्फोट झाला आहे.
इराणच्या पश्चिम चहरमहाल आणि बख्तियारी प्रांतातून उत्तरेकडे कॅस्पियन समुद्रावरील शहरांपर्यंत जाणाऱ्या नैसर्गिक वायू पाइपलाइनमध्ये हा स्फोट झाला. अंदाजे १,२७०-किमी लांबीची ही पाइपलाइन इराणच्या दक्षिणकडील किनारपट्टीजवळील पार्स गॅस क्षेत्राचे केंद्र असलुयेह येथून सुरू होते.
या पाइपलाइनच्या एकापेक्षा जास्त ठिकाणी स्फोट झाले असल्यामुळे यात घातपात असल्याचा संशय आहे. तरी या स्फोटानंतरच्या नुकसानीचा तपशील अजून उपलब्ध होऊ शकलेला नाही. या भागात कोणत्याही घुसखोर गटाच्या कारवायांची माहिती उपलब्ध नाही.
तसेच कोणत्याही गटाने या पाइपलाइनच्या स्फोटांची जबाबदारी घेतलेली नाही. त्यामुळे या स्फोटांबद्दल गूढ निर्माण झाले आहे. इराणचे तेल मंत्री जावेद ओवजी यांनी देखील २०११ पासून या पाइपलाइनमध्ये झालेल्या अनेक स्फोटांबद्दल घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.