पुणे – पुणे शहरासह जिल्ह्यात गारठा पुन्हा वाढू लागला असून, गेल्या २४ तासात एक ते दोन अंशाने घट झाली आहे. शहरातील एनडीए, पाषाण यासह जिल्ह्यातील काही भागातील किमान तापमान दहा अंशाच्या खाली गेल्याने थंडीचा जोर वाढला आहे. बुधवारी (दि. २३) शहराच्या मध्यवर्ती भागात किमान तापमान ११.२ तर एनडीए परिसरात ९.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, पुढील दोन दिवस शहरातील आकाश निरभ्र राहील, अधून-मधून ढगाळ वातावरण राहील आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्यातही काही भागात थंडीचा जोर कायम असून, विदर्भ व मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.
वाऱ्याची चक्रीय स्थिती मराठवाडा व विदर्भाच्या लगतच्या भागावर आहे. तसेच बंगालच्या उपसागरातून आद्रता येत असल्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात हलका पाऊस पडेल. तर राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.