पुणे – महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाला मंगळवारी सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात अॅपला तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने सर्वेक्षणाचे काम संथ गतीने सुरू झाले. एकाचवेळी अॅपवर लॉगिंग झाल्याने सर्व्हरला लोड येऊन तांत्रिक समस्या आल्याने काही प्रगणकांचे अॅप सुध्दा उघडले नाही. परिणामी पहिल्याच दिवशी सर्वेक्षणास अपेक्षित गती मिळाली नाही. दरम्यान ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली असून त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असून मनपा हद्दीत महापालिका आयुक्त हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहे. गोखले इन्स्टिट्यूटकडील प्रशिक्षकांमार्फत (मास्टर ट्रेनर) प्रशिक्षण देण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे दहा हजार प्रगणकांमार्फत मंगळवारी सकाळी प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात सॉफ्टवेअर चांगले चालत होते.
मात्र, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राज्यभरात एकाचवेळी सॉफ्टवेअर वापरात आल्याने सर्व्हर डाऊन झाल्याचे झाल्याने कामात व्यत्यय आला. मात्र, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अनेक प्रगणकांचे मोबाईल चालत नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. यासंदर्भात त्याची माहिती मागासवर्ग आयोगाला देण्यात आली. त्यानुसार सर्व्हरमध्ये सुधारणा केली जात असल्याचेआयोगाकडून सांगण्यात आले.
३१ जानेवारीपर्यंत मुदत
सर्वेक्षणाच्या कामासाठी मनपा हद्दीत २ हजार प्रगणक आणि ग्रामीण भागात ६ हजार ५०० प्रगणकांमार्फत (कर्मचारी) हे सर्वेक्षण केले जात आहे. येत्या ३१ जानेवारी २०२४ पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे. एका प्रगणकास १०० ते १५० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.