नगर -कचरा वाहतूक करतानाच त्याचे वजन वाढीव दाखवून तशी बिले केली आहेत. त्यामुळे कचरा संकलनाच्या कामात मोठा गैरकाभार झाल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे. या प्रकाराची खातेनिहाय चौकशी झाल्यास त्यातून सत्य बाहेर येईल, असा दावाही बोराटे यांनी केला आहे.
दरम्यान, चौकशी करुन ठेकेदाराचा ठेका रद्द करुन महापालिकेची आर्थिक फसवणूक थांबविण्याची मागणीही बोराटे यांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकेलवार यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील कचरा उचलण्याचा ठेका एका ठेकेदार संस्थेला देण्यात आला आहे. हा ठेका देत असताना महापालिकेची कचरा संकलन करणारी वाहने ठेकेदारास भाडेतत्वावर देणे बंधनकारक होते. तथापि, 12 नोव्हेंबर 2019 आखेर मनपाच्या 12 घंटा गाड्या, 6 ट्रॅक्टर, 2 कंटेनर प्लेसर व कॉम्पॅक्टर चालू स्थितीत होते. मात्र, आरोग्य विभागाने एकही वाहन ठेकेदारास भाडेतत्वावर दिले नसल्याने महापालिकेचे नुकसान झाले असल्याचा दावा बोराटे यांनी केला आहे.
मनपाच्या मालकीच्या चालू स्थितीतील वाहने पड आहेत. त्याचा भाडे देखील मिळणार नाही. ठेकेदाराचे हित पाहून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठेकेदाराने कचरा उचलण्याबाबत मागील तीन महिन्यांचे लाखो रुपयांचे बील देयकांची मागणी केली आहे. मात्र, या बिलांत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप बोराटे यांनी केला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वजन काटा उपलब्ध नसल्याने, ठेकेदाराने बाहेरून किती प्रमाणावर कचऱ्याची वाढ दाखवून जादा वजनाचे पावती मनपास सादर केल्या आहेत. दरम्यान महापालिकेच्या विहित नमुन्यातील मुळ कचरा नोंद, डेपो रजिस्टर हे गायब करण्यात आले. त्याऐवजी नव्याने तयार करण्यात आलेल्या साध्या वहीच्या रजिस्टरनुसार बिले अदा करण्याचे विक्रम आरोग्य विभाग करीत आहे.
याप्रकरणात कचऱ्याचे अधिक वजन दाखवून मोठ्या प्रमाणात बिले काढण्यासाठी ठेकेदार प्रयत्नशील आहे. यात अधिकाऱ्यांची साथ असल्याशिवाय असा प्रकार होऊ शकत नाही. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकाराची सखोल चौकशी केल्यास त्यातून गैरकारभार बाहेर येतील, असा दावा बोराटे यांनी केला आहे.