पुणे -हिमालयातील गंगोत्री परिसरातील गंगोत्री 1 या अत्यंत कठीण शिखरावर गिरिप्रेमीच्या पूर्वा शिंदे (सिंह) आणि स्नेहा तळवटकर या दोघींनी यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा फडकवला.
गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरात गंगोत्री शिखर समूह आहे. या समूहात गंगोत्री 1, गंगोत्री 2 आणि गंगोत्री 3 या शिखरांचा समावेश होतो. त्यापैकी गंगोत्री 1 हे सर्वात उंच असून, चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीमध्ये गणले जाते.
या मोहिमेमध्ये पूर्वा शिंदे (सिंह) हिच्या नेतृत्वाखाली स्नेहा तळवटकर, रितू चावला, डॉ. सुनीता कोळके, हेमांग तन्ना यांनी सहभाग घेतला होता. गिरिप्रेमीने दोन वर्षांपूर्वी महिला गिर्यारोहकांच्या संघाची उभारणी करण्याकरिता सुरू केलेल्या गुरुकुल या संकल्पनेतून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील 15 महिला सराव करत होत्या आणि त्यातून महिलांचे दोन संघ तयार झाले.
त्यापैकी पहिल्या संघाच्या जुलै – ऑगस्ट मधील कांग्यत्से 1 आणि 2 या यशस्वी शिखर मोहिमेनंतर या दुसऱ्या महिला संघाने लगेचच तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड अशा शिखरावर मोहीम यशस्वी केली. या गिर्यारोहकांना शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित गिरिप्रेमींचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन मिळाले.