नवी दिल्ली – जागतिक बाजारातून संमिश्र संकेत येऊनही भारतीय बाजारात मात्र गुरुवारी सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा भाव 65 रुपयांनी वाढून 46,012 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा भाव 490 रुपयांनी वाढून 60,172 रुपये प्रती किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,766 डॉलर तर चांदीचा दर 22.74 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
सध्या जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलर वधारत आहे. अशा अवस्थेमध्ये सोन्याचे दर काही काळ अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतात मात्र आगामी काळात बरेच उत्सव येणार आहेत. या काळात भारतात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे भारतात खरेदी वाढेल, या शक्यतेने भारतातील दागिने उत्पादक सोने खरेदी करून ठेवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जर अमेरिकेने व्याजदरात वाढ केली आणि डॉलरच्या किमती वाढल्या तर आंतरराष्ट्रीय बाजारात काही काळ सोन्याचे दर कमी पातळीवर राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये सोन्याची खरेदी करण्याची चांगली संधी असल्याचे बरेच विश्लेषक मानतात.