निमसाखर -रणगाव (ता. इंदापूर) हद्दीतील वालचंदनगर – जंक्शन रोडलगत असलेल्या कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड निवासास्थांनी दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांना इंदापूर न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली.
होमराज उर्फ होम्या उद्धव काळे (वय 40, रा. वाकी शिवार, ता. आष्टी, बीड), अजय उर्फ आज्या सुभाष भोसले (वय 23), सचिन उर्फ आसी सुभाष भोसले (वय 24), अविनाश उर्फ आवी उर्फ महींद्रा सुभाष भोसले (वय 22, तिघे रा. माहीजळगाव, ता. कर्जत) व राहुल उर्फ काळ्या पटु भोसले (वय 28, रा. वाळुज पारगाव, पाथर्डी) अशी या दरोडेखोरांची नावे आहेत.
27 डिसेंबर 2021 रोजी पहाटे दिडच्या सुमारास सहा जणांच्या टोळीने राजेंद्र गायकवाड यांच्या घरावर दरोडा टाकला होता. गायकवाड यांचय पत्नीच्या गळ्याला चाकू लावून कपाटातील देवाची भांडी, सोने, वीटभट्टीतील वीट विक्रीतुन आलेली रक्कम अशी लाखो रुपयांची लूट केली होती. यासह दुसऱ्या ठिकाणी ही अशाच प्रकारे सुरू झाली होती.
गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करुन 4 एप्रिल रोजी आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.