पुणे -जिल्हा परिषदेने विविध विभागांच्या सेवेबरोबरच कामकाजामध्ये पारदर्शकता येण्यासाठी प्रोसेस मॅपिंग कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत, पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करीत जिल्हा परिषदेला शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना शुभेच्छा संदेश पाठवित ते करीत असलेल्या कामाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील प्रशासन कार्यक्षमतेने चालविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची मोठी भूमिका असते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत अनेक सेवा दिल्या जातात. या सेवा देताना त्याबाबतच्या विषयांची मंजूरी व पडताळणी करण्यासाठी कार्यालय फाईल्स, कागदपत्रांचा प्रवास वेगाने झाला तर सर्वसामान्यांचे प्रश्न लवकर मार्गी लागू शकतात.
त्यासाठी प्रकरणे निकाली काढण्याच्या प्रक्रियेतील टप्पे अधोरेखित करुन नियमानुसार त्यातील त्रुटी व दोष शोधणे आवश्यक आहे. याकरीता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. या अंतर्गत या प्रोसेस मॅपिंगमध्ये विविध स्तरावरील तपासणी व मान्यतेचे टप्पे निश्चित करण्यात आले असून त्याचे एक आदर्श मॅन्युअल तयार करण्यात आले आहे.
हे मॅन्युअल महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगत या प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामात अचुकता, वेळेची बचत, मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर, पारदर्शकता व तात्काळ निर्णय घेण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.